१६ लाखाच्या मुद्देमालावर डल्ला ; पंढरपूर शहरात घडली घटना

पंढरपूर 25 // शहरातील फर्निचरचे प्रसिद्ध व्यापारी अजित फडे यांच्या घरातून सुमारे १६ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. यात सोन्या-चांदीचे दागिने, पितळेची भांडी आणि रोख रक्कम असा ऐवज होता. ही चोरी ९ ते १३ डिसेंबर या दरम्यान झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात संजीवनी फडे यांनी तक्रार दिली आहे.
यामध्ये १२ लाख ६३ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने; २ लाख ३ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि वस्तू; ५० हजार रुपये किंमतीचा सोने मोती असलेला खंडेलवालचा सेट, तसेच ५० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी संजीवनी फडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ डिसेंबर रोजी संजीवनी व पती अजित फडे हे मधुरिमाला पुणे येथे सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ते पंढरपूरला परत आले, तेव्हा त्यांना घरातील फ्रीजमधील चांदीचा जार दिसला नाही. तसेच घरातील कपाटावरील साडी खाली पडलेली दिसून आली. यानंतर त्यांनी घरात पाहिले असता सोन्या-चांदीचे दागिने, पितळेची भांडी व रोख रक्कम असा एकूण १५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे समजले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.