पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत 57.81 टक्के मतदान ; कोण बाजी मारणार याची उत्सुकता

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत 57.81 टक्के मतदान ; कोण बाजी मारणार याची उत्सुकता

सोलापूर || पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी आज शनिवार दि.17 एप्रिल 2021 रोजी मतदान सकाळी सुरू झाले.तत्कालीन आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहिर केली.महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाचे उमदेवार समाधान आवताडे यांच्यात ही मुख्य लढत होती.

आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पंढरपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 78 हजार 190 पुरुष व 1 लाख 62 हजार 694 महिला असे आणि इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी मतदानाचा अधिकार 1 लाख 3 हजार 641 पुरुषांनी व 93 हजार 414 महिलांनी असे एकूण 1 लाख 97 हजार 55 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची सरासरी टक्केवारी सायंकाळी 5 पर्यंत 57.81 झाली. 

सकाळपासून मतदारांचा वेग मंद होता.दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 33.12 टक्के झाली. संथगतीने मतदान होत असल्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झाले. सायंकाळी मतदान संपेपर्यंत केवळ 57.81 टक्के मतदान झाले.पंढरपूर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीकडे मतदारांनी कोरोनामुळे पाट फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.महाविकास आघाडीच्या उमेदवारास भारतीय जनता पार्टीच्या उमेदाराने आव्हाण दिले होते. या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाकडून या मतदार संघाचे तत्कालीन खासदार व सध्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार अमोल मिटकरी यांच्या सभा चांगल्या गाजल्या.तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निवडणुकीसाठी तळ ठोकला होता. विजय खेचूनचं आनणार याचा ठाम निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी चंग बांधला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपा समाधान आवताडे यांचे नशिब मोहरबंद झालेले आहे.निकाला अगोदरचं या निवडणूकीत विजयी कोण होईल याची चर्चा मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रंगत आहे. काही जनांनी तर पैजा लावलेल्या आहेत.