ब्रेकींग || दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री ; हसन मुश्रीफ आणि अजित दादांची ‘पॉवर’ वाढली

ब्रेकींग || दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री ; हसन मुश्रीफ आणि अजित दादांची ‘पॉवर’ वाढली

मुंबई || अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. तर गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असं ही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गृहमंत्रीपदाची माळ दिलीप वळसे-पाटलांच्या गळात पडल्याचं निश्चित झालं आहे. 

दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. तशी विनंती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं मंत्रिमंडळातील पॉवर ही आता आणखीनचं  वाढणार आहे.

अशी आहे दिलीप वळसे पाटील यांची कारकीर्द …

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.

2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या विधीमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्रियांच्या खडानखडा माहितीमुळे आघाडी सरकारला चांगलंच बळ मिळालं होतं.