इंदापूर पंचायत समिती आवारात महिलांसाठी सखी कक्षाची निर्मिती ; सभापती स्वाती शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन

इंदापूर पंचायत समिती आवारात महिलांसाठी सखी कक्षाची निर्मिती ; सभापती स्वाती शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन

इंदापूर 08 // पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या इतर सुविधांसाठी साठी सखी कक्षाची स्थापना तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती आवारामध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी देखील आज दिनांक 8 मार्च महिला दिनी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने इंदापूर पंचायत समिती आवारात या सखी कक्षाचे उद्घाटन इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिला पंचायत समिती सदस्यांसह कार्यलयीन महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

महिलांना येणाऱ्या समस्या आणि बाबत त्या इतर कुठेही बोलू शकत नाहीत. मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखणे, मळमळणे, चक्कर येणे,साखर कमी होणे अशा प्रकारचे अनेक छोटे मोठे त्रास होत असतात. यावेळी त्यांना काहीकाळ विश्रांतीची गरज असते. अशावेळी स्त्री कर्मचारी असो किंवा कार्यालयात येणाऱ्या इतर महिला पदाधिकारी असो अशा सर्वांनी गरज ओळखून या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व महिलांची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये महिलांनी त्यांना येणाऱ्या अशा विविध अडचणी आयुष प्रसाद यांकडे मांडल्या होत्या. त्यानुसार आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामध्ये एक सखी कक्ष उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या कक्षात महिलांना अशा प्रसंगी किंवा स्तनपान करण्यासाठी एक काॅट, गरम पाण्याची सोय,प्राथमोपचार पेटी,सॅनिटरी नॅपकिन अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून आवश्यक सुचना करण्यासाठी तक्रार पेटीची सोय देखील करण्यात आली आहे.