गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची बिजवडी शाळेला सदिच्छा भेट ; केलं विशेष कौतुक

गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची बिजवडी शाळेला सदिच्छा भेट ; केलं विशेष कौतुक

इंदापूर || भोर पंचायत समितीच्या उपक्रमशील गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे इंदापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी या दोन्ही मान्यवरांनी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सखोल माहिती घेतली.

गटशिक्षणाधिकारी सोनवणे म्हणाल्या की,कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवाहात टिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी केलेली व्हिडिओ निर्मिती , ऑनलाइन चाचण्या व ऑनलाईन खेळ निर्मिती, कृतीपत्रिका निर्मिती, लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती या सर्व बाबींचे मी विशेष कौतुक करते.शाळेतील शिक्षकांचे तालुकास्तरीय ऑनलाईन शिक्षणातील योगदान हे कल्पनेच्या बाहेरील आहे.त्यांनी केलेल्या कष्टातून नक्कीच ही युवा पिढी घडल्याशिवाय राहणार नाही.

गटशिक्षणाधिकारी बामणे म्हणाले की,तालुक्यातील महिला शिक्षकांनी विद्यार्थी प्रति असणाऱ्या स्वतःच्या तळमळीतून डिजिटल शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे. तालुक्यामध्ये महिला तंत्रस्नेही शिक्षिकांचे लक्षणीय प्रमाण ही कौतुकास्पद बाब आहे.दरम्यान त्यांनी शिक्षण विभागाच्या सावित्रीच्या लेकी  या पुस्तकाविषयी माहिती सांगत तालुक्यातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विषयक विविध उपक्रमांची माहिती दिली.तालुक्यातील ऑनलाईन शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या महिलांच्या विशेष योगदानाबद्दल माहिती देत त्यांचे कौतुक केले. 

तालुक्यातील बिजवडी येथील जिल्हा परिषद शाळेत साप्ताहिक ऑनलाईन कृतीपत्रिका , साप्ताहिक ऑफलाईन कृतीपत्रिका ,ऑनलाईन चाचण्या, ऑनलाइन झूम क्लासेस, स्टार ऑफ द वीक उपक्रम, गणित अध्ययन समृद्धी उपक्रम, स्माईली उपक्रम , इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम, कला कार्यानुभव उपक्रम, संगणक कक्ष, स्वच्छता विषयक उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, ओसरीवरील शाळा उपक्रम, फिरते वाचनालय आदी उपक्रम राबवले जातात अशी माहिती शाळेतील शिक्षिका श्रीमती रुकसाना युसुफ शेख व श्रीमती इशरत हमीद मोमीन यांनी दिली.