बोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला होता कर्नाटकचा गुटखा ! पोलिसांच्या नजरेने हेरलाचं

बोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला होता कर्नाटकचा गुटखा ! पोलिसांच्या नजरेने हेरलाचं

सांगोला || कर्नाटकमधून पुण्याला भाजीमध्ये लपवून चाललेला 41 पोती अवैध गुटखा  सांगोला पोलिसांनी  पकडला. पोलिसांनी ही कारवाई येथील वंदे मातरम चौकात केली. यामध्ये 14 लाख 64 हजार 420 रुपयांच्या गुटख्यासह एकूण 19 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली आहे. 

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बुधवारी (ता. 5) दुपारी तीनच्या दरम्यान पोलिस नाईक महेश पवार व पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांना वंदे मातरम चौकात एमएच 14/जीडी 5444 हा टेम्पो संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्याचा चालक हसन सिराज शेख (रा. कोंढवा बु., पुणे) तसेच अल्लाबक्ष अब्दुलगनी बागवान (रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी टेम्पोमध्ये विमल पानमसाला, तंबाखूजन्य जर्दा हे बोंबील, भुसा, कांदे आदी तरकारी मालात 41 गुटख्याची पोती लपवली होती. या वेळी अन्न व औषध प्रशासन अधिकारी मंगेश लवटे यांनी चौकशी केली. 14 लाख 64 हजार 420 रुपयांचा गुटखा व पाच लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 19 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.