हिंमत असेल तर जनतेची वीज तोडून दाखवा, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा 

हिंमत असेल तर जनतेची वीज तोडून दाखवा, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा 

कोल्हापूर // लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करावे, यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. वीजबिलात दरवाढ झाल्याने राज्यभरात सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. वीज बिल भरणार नाही, राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर सर्वसामान्य जनतेची वीज तोडून दाखवावी, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करू, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. तर दिवाळीत गोड बातमी सर्वसामान्य जनतेला देऊ, असे आश्वासन देखील महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलं होतं. मात्र या उलट भूमिका घेत सक्तीने वीज बिल वसूल करू, अशी भाषा राज्य सरकारने केली. येणाऱ्या काळात विज बिल माफ झाली पाहिजेत, अन्यथा रस्त्यावरची लढाई सुरूच राहील, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विज बिल माफीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, वीज तज्ञ प्रताप होगाडे, आमदार प्रकाश आवाडे, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन तो प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.