लॉकडॉऊन तात्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील - खासदार उदयनराजे भोसले

लॉकडॉऊन तात्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील - खासदार उदयनराजे भोसले

सातारा || कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडॉऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडॉऊन तात्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

शनिवारपासून सक्तीचे लॉकडॉऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीक मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडॉऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ञ सांगतो. त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडॉऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडा टाकावेत, असा अनाहूत सल्ला देखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत आता भुकेने व्याकूळ देखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवर देखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असे देखील त्यांनी ठणकावले.

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.