बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना १५ लाखांची मदत,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुटुंबाकडे सुपुर्त केला मदतीचा धनादेश 

बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना १५ लाखांची मदत,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुटुंबाकडे सुपुर्त केला मदतीचा धनादेश 

करमाळा दि.११ // करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जयश्री शिंदे यांच्या कुटुंबाचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करुन त्यापैकी  ५ लाख रुपयाच चेक त्यांनी सदरच्या कुटुंबियांना दिला.तर उर्वरित १० लाख रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देखिल दिले आहेत. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, सरपंच विनोद जाधव, पोलीस पाटील अंकुश कोठावळे, जिल्हा परिषदेचे सदस्य सवितादेवी राजेभोसले,  माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्री.भरणे म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील तीन व्यक्तींचा जीव गेलेला आहे, ही अत्यंत  दुर्दैवी घटना आहे.बिबट्याला ठार मारण्याची परवानगी नागपूर वन विभागाकडून मिळवली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  हेलिकॉप्टरची मदत लवकरच घेणार आहोत. बिबट्याचा वावर सातत्त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असून अशा स्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडताना  काळजी घ्यावी. वन विभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल. ड्रोनच्या माध्यामातून बिबट्या चा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मात्र तो ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत निश्चित घेतली जाईल, असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अंजनडोह येथील ग्रामस्थांना दिला.

उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी सांगितले की, बिबट्याचा ठावठिकाणा 16 नोव्हेंबरपासून ट्रॅक करणे सुरू आहे. मात्र बिबट्या रोज ठिकाण बदलत असल्याने आणि या परिसरात ऊस, केळीची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने पकडणे अवघड जात आहे. मात्र 21 पिंजरे, तीन ड्रोन कॅमेरे, 42 ट्रॅप कॅमेरे, पाच शार्प शुटर, दोन बेशुद्ध करणारे पथक, एक डॉग स्क्वाॅड अशा 16 वेगवेगळ्या टीम  दिवसरात्र कोबिंग ऑपरेशन करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणेची मदत होत असून राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत घेण्यात येणार आहे. सर्व यंत्रणा बिबट्यासाठी वापरतोय, मात्र बिबट्या रोज ठिकाण आणि मार्ग बदलत आहे. बिबट्याला लवकरच ठार मारू, नागरिकांनी काळजी घ्यावी. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे 15 लाखांची मदत दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात पाच लाखांची मदत दिली आहे