आयत्या बिळावर जाऊन बसलेल्यांनी साहेबांची मापं काढणे बंद करावे - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

आयत्या बिळावर जाऊन बसलेल्यांनी साहेबांची मापं काढणे बंद करावे - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

सांगली 15 // भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाद वाढत चालला आहे, शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता, त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

पूजा चव्हाण तरूणीने आत्महत्या केल्याने शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना विचारला होता, त्यावर बोलताना पवारांनी ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का? असं सांगत त्यांची खिल्ली उडवली होती.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करीत  म्हटले होते की, शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काही तरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी काढला होता.

यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे. विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणार्‍यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.