जेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी व चेंबरची सफाई होणार - अंकिता शहा

जेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी व चेंबरची सफाई होणार - अंकिता शहा

इंदापूर (देवा राखुंडे)  || इंदापूर शहराकरीता नव्याने उपलब्ध झालेल्या जेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी व चेंबरची साफ  करण्यात येणार आहेत. तसेच या मशीनद्वारे रोगराईच्या काळामध्ये औषध फवारणी करण्याची सुद्धा सोय आहे त्यामुळे भविष्यात शहरातील साफसफाई व औषध फवारणी करण्याकरिता या मशीनचा अत्यंत उपयोग होणार आहे.असे प्रतिपादन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.

इंदापूर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत मिळालेल्या बक्षीस रकमेतून खरेदी केलेल्या जेटिंग मशीनचे इंदापूर शहरातील लोकमान्य नगर येथे प्रात्यक्षिक करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अंकिता शहा बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा व नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

शहा म्हणाल्या की, मागील पंधरा दिवसापूर्वी सक्शन मशीन वाहन खरेदी करण्यात आले आहे.त्याद्वारे शहरातील सार्वजनिक तसेच खाजगी शौचालयाच्या टाकीतील मैला उपसण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मागील चार पाच वर्षापासून इंदापूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत सलग मिळालेल्या मानांकना मूळे बक्षीस रुपी मिळालेल्या रकमेतून ही वाहने खरेदी करण्यात आली असून अजून काही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. इंदापूर शहरातील सर्व नागरिक बंधूंनी स्वच्छते बाबत केलेल्या सहकार्यामुळेच आज आपल्या शहराचे व नगर परिषदेचे नाव देशपातळीवर नोंदले गेले आहे. 

मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले की, पुढेही सर्व नागरिकांनी स्वच्छते संबंधी जागरूक राहून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करावे व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा नोंदवावा आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.