ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन काम करण्याची गरज - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन काम करण्याची गरज - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

नाशिक || काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. कँबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पुण्यश्लोक फाउंडेशन नाशिक यांच्या माध्यमातून हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री भरणे बोलत होते. दरम्यान सकल धनगर समाजाच्यावतीने राज्यमंत्री भरणे यांचा नागरी सन्मान करण्यात आला.

भरणे म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास ही त्यांनी यावेळी समाज बांधवांना दिला. समाजापुढे अनेक प्रश्न आहेत.येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडविण्यात येतील. चांदवडच्या रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून दिला जाईल. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल.असे ही ते म्हणाले.

यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, आमदार हरिभाऊ भदे, शिवाजीराव ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले.