ही निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात - आमदार गोपीचंद पडळकर

ही निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात - आमदार गोपीचंद पडळकर

पंढरपूर || बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. 

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. पडळकर म्हणाले, ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर महाविकास आघाडी सरकारविरोधात मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

ते पुढे म्हणाले, की बारामतीत मी लढलो,माझे डिपॉझिट जप्त झाल्यावर मला कोणी तिकीट देईल का ? पण मला दिले. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदार केले. मी तीन निवडणुका लढवल्या, तिन्ही निवडणूकार मला हार पत्करावी लागली.अगदी लोकसभेलाही मी हरलो. बारामतीत माझं डिपॉझिट जप्त झाले. पण माझी आमदार होण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यामुळेच मला आमदारकी मिळाली. पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचीही तशीच इच्छा आहे. त्यांनाही आमदार व्हायचे आहे. मला खात्री आहे, पंढरपूरच्या या भूमीत यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल,असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.