द वायर, NDTV, द प्रिंट सारख्या माध्यमांना त्रास दिला गेला, तेंव्हा भाजपच्या नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

इंदापूर दि.04 // भाजपच्या काळात आजवर सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली गेली, द वायर, NDTV, द प्रिंट या माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला, तेंव्हा मात्र आज गळे काढणाऱ्या भाजपच्या नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलंय असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर याबाबत प्रतिक्रियात्मक पोस्ट करित म्हटले आहे कि, याच 'अभिनेत्या'मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप असो, 'सोशल मीडिया हब'सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न असो किंवा पत्रकारांचा हक्क हिरावून घेणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा? भाजप किती दिवस अशा दोन डगरींवर हात ठेवून आपलं राजकीय पोट भरणार आहे? एखाद्या सामान्य नागरिकावर अन्याय झाला असेल तर त्याचा तरी विचार करणार की नाही? विशेष म्हणजे ही काही त्यांच्याप्रमाणे सुडाने केलेली कारवाई नाही, तर कायदेशीर प्रक्रिया आहे आणि यामध्ये तुम्हाला बचाव करण्याची पूर्ण संधी असते. असं असतानाही पोलिसांच्या या कारवाईविरोधात एवढे गळे काढण्याचं कारण समजत नाही !