माझ्यापेक्षा कोण उत्कृष्ट असेल तर उपसमितीचे अध्यक्षपद त्याकडे सोपवा - मंत्री अशोक चव्हाण

माझ्यापेक्षा कोण उत्कृष्ट असेल तर उपसमितीचे अध्यक्षपद त्याकडे सोपवा - मंत्री अशोक चव्हाण

जालना दि.28 // मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर मी प्रामाणिकपणे काम करीत आहे.मात्र काहीजन जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. जर माझ्यापेक्षा उत्कष्ट काम करील असे मुख्यमंत्र्यांना वाटले तर त्यांनी त्याच्याकडे ती जबाबदारी सोपवावी.मी मात्र मराठा समाजाचा एक सहकारी म्हणून  माझा लढा चालूच ठेवीन असे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. जालना येथे मंगळवारी (ता. 27 ऑक्‍टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.

ते म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द झालेले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करावा लागणार आहे.महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणावर गांभीर्याने काम करत आहे मात्र काहीजण या प्रश्‍नावरही राजकारण करत आहेत. मराठा आरक्षणाचे एवढे गांभीर्य आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल का केली नाही? नऊ ते दहा संघटनांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. एका मर्यादेपुढे जाता येत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर जाऊन स्थगिती उठविण्याची मागणी करणे, हे उचित होणार नाही. त्यामुळे सुनावणी घटनापीठासमोरच व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. सात ऑक्‍टोबरला तशी मागणी सर्वोच्च न्यायालयात लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नमूद केले.